Loading Seva
आमच्या उत्सव, कार्यक्रम आणि महत्त्वाच्या घोषणांसह अपडेट रहा.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत सध्या मंदिर व मंदिर परिसराच्या संवर्धनाचे आणि जिर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दर्शन व्यवस्था सुलभ राहावी यासाठी खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत: सलग सुट्ट्या / जास्त गर्दीच्या काळात प्रवेश व्यवस्था: सलग सुट्ट्यांचे दिवस, गर्दीची वेळ किंवा मंदिर प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रगटनानुसार 'महाद्वार' मार्गे असणारा नेहमीचा प्रवेश बंद ठेवण्यात येईल. या काळात भाविकांना 'बिडकर पायरी' जवळील मार्गाने दर्शन मंडपामध्ये प्रवेश दिला जाईल. इतर (सामान्य) वेळी प्रवेश व्यवस्था: सामान्य दिवशी तसेच नेहमीच्या वेळी पूर्ववत 'महाद्वार' मार्गानेच प्रवेश सुरू राहील. दर्शन वेळ: मंदिर परिसर संवर्धनाचे काम सुरू असले तरी, भाविकांसाठी दर्शनाची वेळ ही पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच नियमित सुरू आहे. पेड दर्शन पास (Paid Darshan Pass): पेड दर्शन पासची सुविधा निश्चित केलेल्या अधिकृत केंद्रांवर/ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची विनंती: भाविकांनी दर्शनाला निघण्यापूर्वी किंवा मंदिरात येताना अधिकृत माहितीची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी. सर्व भाविकांना माहिती मिळावी व दर्शनात सुलभता यावी हाच या सूचनेचा मुख्य उद्देश आहे.

हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला अत्यंत पवित्र आणि मानाचे स्थान आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी आदिशक्ती जगदंबेचे स्वागत करण्यासाठी 'घटस्थापना' केली जाते. घटस्थापना म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून, ती निसर्गाची पूजा आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणणारा उत्सव आहे. घटस्थापनेचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व :- घटस्थापना हा नवरात्रीचा पाया आहे. 'घट' म्हणजे कलश, जो ब्रह्मांडाचे आणि मानवी शरीराचे प्रतीक मानला जातो.दैवी शक्तीचे आवाहन: घटस्थापना करून आपण घटामध्ये आणि अंबाबाईच्या मूर्तीमध्ये नऊ दिवसांसाठी देवी दुर्गेच्या विविध रूपांचे आवाहन करतो.समृद्धीचे प्रतीक: घटाखाली मातीत धान्य पेरले जाते. नऊ दिवसांत हे धान्य जसे अंकुरते आणि वाढते, तसेच आपल्या घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य वाढावे, हा त्यामागील उद्देश असतो.निसर्ग पूजा: या विधीमध्ये माती, पाणी, पाने आणि धान्य यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. हा विधी आपल्याला निसर्गाप्रती कृतज्ञ राहण्याची शिकवण देतो. घटस्थापनेसाठी आवश्यक संपूर्ण साहित्य :- १)घट/कलश: तांब्याचा, पितळेचा किंवा मातीचा कलश. २)देवीची मूर्ती किंवा फोटो: ज्यांची आपल्याला नऊ दिवस पूजा करायची आहे. ३)धान्य पेरण्यासाठी पसरट भांडे/पत्रावळी/अथवा आपल्या रूढी परंपरेनुसार साहित्य . ४) काळी माती: शेतातील किंवा बागेतील स्वच्छ माती. ५) सप्तधान्य: जव (यव), गहू, तीळ, ज्वारी , करडी, मूग, बाजरी आणि चणे इत्यादी उपलब्द धान्य साहित्य (हे धान्य एकत्र करून ठेवावे). कलशात टाकायचे साहित्य:- १)शुद्ध पाणी किंवा गंगाजल २)सुपारी व नाणे (१ /उपलब्ध रुपयाचे नाणे) दुर्वा आणि हळद-कुंकू/अक्षदा इतर साहित्य: - १)आंब्याची किंवा विड्याची पाने: कलशावर ठेवण्यासाठी (५ किंवा ७ पाने). २)शहाळे किंवा नारळ: कलशावर ठेवण्यासाठी (शक्यतो शेंडी असलेला अथवा आपल्या कुटूंबाच्या पद्धती नुसार ). ३)कापड: देवीच्या आसनासाठी. ४)अखंड दिवा: नऊ दिवस सतत जळणारा दिवा आणि त्यासाठी लागणारे तेल/तूप आणि वात. ५)माळा मांडणी केलेल्या घटाला रोज वाहण्यासाठी वेगवेगळ्या नागवेली चे पान, फुलांच्या माळा.. ६) आवश्यक ते पूजा साहित्य धूप, दीप, कापूर आणि अगरबत्ती इत्यादी . घटस्थापनेची शास्त्रीय मांडणी:- १)घटस्थापना नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागी/ देवघर समोर करावी. घराचा ईशान्य कोपरा यासाठी सर्वोत्तम मानला जातो. २)जागा स्वच्छ करणे: पूजेची जागा व्यवस्थित पुसून घ्या. तिथे सुंदर रांगोळी काढा ३) धान्य पेरणे: पात्र/पत्रावळी/आपल्या पद्धतीनुसार त्या जागी त्यात थोडी माती पसरवून त्यावर 'सप्तधान्य' पेरावे आणि पुन्हा वरून थोडी माती टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. ४)कलश तयार करणे: तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्यात थोडे गंगाजल, हळद-कुंकू, अक्षता, एक सुपारी, एक नाणे आणि दुर्वा टाकाव्यात धार्मिक पद्धीतीने योग्य सामग्री टाकावी . ५) पाने आणि नारळ ठेवणे: कलशाच्या तोंडावर आंब्याची ५ किंवा ७ पाने वर्तुळाकार ठेवावीत. त्यावर नारळ (शेंडी वरच्या बाजूला करून) स्थापित करावा. हा तयार झालेला घट मातीच्या बरोबर मध्यभागी ठेवावा. ६)देवीची स्थापना: घटाच्या मागे किंवा शेजारी पाटावर देवीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. अथवा देवघरसमोर घट मांडणी असेल तर संपूर्ण देवघर मधील नऊ दिवस च्या दृष्टीने पूजा करावी ,देवीला हळद-कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करावा. ७)अखंड दीप प्रज्वलन: शेवटी, देवीचे स्मरण करून 'अखंड दिवा' प्रज्वलित करावा. हा दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड जळत राहील याची काळजी घ्यावी लागते.